Madhurimaraje यांची माघार, Satej Patil संतापले । Kolhapur Utttar माघारी मागची कारणे काय?
संतापले, रागावले, गहिवरले आणि रडले…. एकाच दिवसात सतेज उर्फ बंटी पाटलांच्या दोन विरुद्ध बाजू पहायला मिळाल्या
Madhurimaraje
ज्याचं कारण होत उत्तर कोल्हापूर मधून काँग्रेस च्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी घेतलेली माघार. पण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनी माघार नेमक्या कोणत्या कारणांमुळे घेतली व आता याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल तेच समजून घेऊयात.
माघार घेण्याची कारणे जाणून घेण्यापूर्वी मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये नक्की कश्या घडामोडी घडल्या यावर एक नजर टाकुयात. कोल्हापूरच्या जागावाटपामध्ये विजयाची जबाबदारी घेत 10 पैकी पाच जागा सतेज पाटलांनी काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या. ज्यातील कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी साठी सतेज पाटलांनी पाहिलं राजघराण्यात विचारलं होत मात्र तेव्हा त्यांना राजघराण्यातून नकार मिळाला. त्यानंतर राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला, अश्यातच राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर लढण्यासाठी पुन्हा होकार देत मधुरिमा राजे यांना उशिरा उमेदवारी दिली गेली. पण उमेदवारी डावल्याने राजेश लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर लाटकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेकांनी त्यांची समजूत काढली पण त्यांनी काही माघार घेतली नाही. या उलट मधुरिमा राजे यांची अर्ज मागे घ्यायला शेवटची १५ मिनिटे बाकी असताना माघार घेतली. यानंतर कलेक्टर ऑफिस मध्ये संतापलेले, आणि रात्री कार्यकर्त्यांसोबत बोलताना गहिवरलेले सतेज पाटील आपल्याला पहायला मिळाले.
आता कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढवणाऱ्या या माघारी मागची ची नेमकी कोणती कारणे असू शकतात ते पाहुयात.
सर्वात पाहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे पराभवाची भीती. कोल्हापूर उत्तरमध्ये पेठा आणि बावड्यांचा भाग निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतो. दरम्यान कदमवाडी व सदर बाजार भागातून राजेश लाटकर यांची वोट बँक असल्याने तो त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे. लाटकरांनी माघारीसाठी तंगवल्याने आणि पेठांमधील गणिताचा विचार करून छत्रपती घराण्याने धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. कारण अर्ज मागे घेतल्यावर माध्यमांशी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी “नाईलाजास्तव उमदेवारी मागे घ्यायला लागली. लाटकरांनी देखील उमेदवारी मागे घेतली नाही. अश्या स्थितीत निवडणूक लढवणे योग्य वाटले नाही.” अशी प्रतिक्रिया दिली होती. तर मालोजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे या माघारी मागे पराभवाची भीती हे कारण असण्याची दाट शक्यता आहे.
या माघारी मागचं दुसरं कारण म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटलांचा वाढणारा दबदबा.
धनंजय महाडिक असतील किंवा मागं चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरमध्ये होते तेव्हापासून बंटी पाटील हे नाव कोल्हापूरच्या राजकारणात अनेकांना जड गेलंय. कोल्हापूरमध्ये काँग्रेस रुजवण्याचं काम बंटी पाटलांनी केलं, आणि बंटी पाटलांच्या यशस्वी घोउदौडीला ब्रेक लावण्यासाठी विधानसभेची निवडणूक व आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवत एकनाथ शिंदेंनी हा डाव टाकल्याचं बोललं जातंय. ज्यासाठी त्यांनी मागच्या काही काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी चांगले संबंध प्रस्थापित झालेल्या देवेंद्र फडणवीसांची मदत घेतली आहे, अश्या चर्चा सध्या जोर पकडत आहेत.
तर यामागचं तिसरं कारण जे समोर येत ते म्हणजे घरातील महिलांनी राजकारणात पडू नये असं म्हणत राजघराण्यातूनच झालेला विरोध. राजघराण्यामधील इतरांपेक्षा महिलांच राजकारण मोठं होऊ नये असा मतप्रवाह शाहू महाराज छत्रपती यांच्या काही समर्थकांचा असून सल्लागार समितीनेच मधुरिमा राजेंवर दबाव टाकत त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला अश्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र या फक्त चर्चा असल्याने यात किती सत्य आहे हे सांगणे अवघड आहे.
माघार कोणत्याही कारणामुळे जरी घेतली असली तरी पण आता दोन दोन उमेदवार देणाऱ्या काँग्रेस कडे स्वतःचा एकही उमेदवार नाही हि सत्य परिस्थिती आहे. ज्यात कुठेतरी बंटी पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसला. त्यामुळे आता बंटी पाटील समर्थक दुप्पट जोमाने काम करून लाटकरांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार बनवून त्यांच्यासाठी मैदानात उतरतील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमधून महायुतीचे उमेदवार असलेल्या राजेश क्षीरसागर यांना मात्र याचा मोठा फटका बसू शकतो.
तर अश्यातच महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या नेत्यांसोबत चर्चा करून पुढची दिशा ठरवणार आहोत अशी माहिती सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ते आता पुढे काय करणार हे पहाणे महत्वाचं असेल. दरम्यान काल दिवसभरात झालेल्या या संपूर्ण नाट्यानंतर सतेज पाटील पुढे कोणती नवी रणनीती आखणार? कोल्हापूर उत्तर मध्ये नेमकं कोण बाजी मारणार? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे