मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहेत ३ पर्याय!!

शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केला. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत मिळून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. विधानसभेत १६३ सदस्यांचं बहुमत देखील मिळवलं.मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
दरम्यान शिवसेनेने पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने यावर खंडपीठ नेमलं असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या १० व्या तरतुदीनुसार शिंदे गटातील समर्थकांना आपली आमदारकी वाचवायची असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल असा दावा करण्यात येतो आहे. तर शिंदे गटाचे म्हणणे आहे खरी शिवसेना म्हणजे शिंदेगट होय. सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिंदेगटाकडे असणारे ३ पर्याय सांगितले आहेत. शिंदे गट आपलं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करेल, अद्यापही या गटात कोणीही पक्ष सोडण्याची भाषा केलेली नाही म्हणून ते शिवसेना म्हणूनच राहतील.
शिंदे गटासमोर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे भाजपामध्ये शिंदेगट विलीन करणे. पण असे झाले तर स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही याची जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे.भाजप हा एक समुद्र आहे त्यात विलीन झाले तर आत्तापर्यंत सांगितलेला शिवसेनाचा वारसा, लोकांचा विश्वास याला तडा जाण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट चांगलीच माहित आहे.
शिंदेसमोर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे समजा दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची वेळ आली तर मनसे हा उत्तम पर्याय आहे. कारण राज ठाकरेंसारखा हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेणारा लोकप्रिय नेता शिवाय सोबत ठाकरे नाव आहेच.एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे जवळचे आणि चांगले संबंध आहेत. समजा असा प्रस्ताव आला तर विचार करेन असेही राज ठाकरे म्हणाले आहेत असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे. तेव्हा आता १ ऑगस्टला काय होणार शिंदेगट कोणता पर्याय स्विकारणार ते पहावं लागेल.