आंदोलनाची आग, थंडीची लाट त्यात महाराष्ट्र बंदची हाक! सध्या एकाच वेळी परभणी मध्ये अनेक घटना घडत आहेत. म्हणूनच परभणीमध्ये नेमकं काय चाललंय? सध्या परभणीकर कोणत्या परिस्थितिचा सामना करत आहेत? हे जाणून घेताना सध्याच्या परभणी जिल्ह्यातील घडामोडींवर नजर टाकुयात
काही दिवसांपूर्वी परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरूने विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्यात आली . तर या सर्व हिंसाचारानंतर पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते.
आधीच हिंसाचार चालू असलेल्या परभणीत, हिंसाचारानंतर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल होत. मात्र, न्यायालयीन कोठडीत या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने हे सर्व प्रकरण अजूनच चिघळले. तर या मृत्यूसंदर्भात “सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता” असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असा आरोप अनेक आंदोलकांकडून होत आहे. एकूणच या सर्वगोष्टींमुळे सध्या परभणीच वातावरण अजूनच तापलं आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावर केल्या जाणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनंतर आता न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. तर या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर दोषारोप केले जात असून या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
एकीकडे आंदोलनाच्या आगीत तापलेल्या परभणीमध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी पडली आहे. परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे. जिल्ह्यातील किमान तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, तापमानात झालेल्या या विक्रमी घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागासोबतच काही शहरी भागांमध्ये देखील थंड वाऱ्यांचा जोर वाढत आहे. या हाड गोठवणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक उबदार कपडे, शेकोट्या यांचा आधार घेत आहेत. शेतकरी वर्गासाठी ही थंडी काहीशी फायदेशीर जरी असली, तरीही थंड हवामानामुळे फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती कायम असून या थंडीमुळे बळीराजा चिंतेत आहे. तर आरोग्य तज्ञांनी नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
एकीकडे ५ अंशावर गेलेलं तापमान, हाड गोठवणारी थंडी, आणि या सगळ्यात परभणी मध्ये चालू असलेला हिंसाचार या सगळ्यामुळे सध्या परभणीकरण अतिशय हैराण झाले असून त्यांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. तर या सगळ्या परिस्थितीवर तुमचे मत काय? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटत? ते कंमेंट करून नक्की सांगा.