सध्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोन्ही मुंडे भावा बहिणींना स्थान मिळाल आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे हे दोघे भाऊ बहीण एकाच सरकारमध्ये मंत्री होतील, असा कोणी कधी विचारही केला नसेल. म्हणूनच आज एकत्र दिसणारे हे मुंडे भाऊ बहीण अगोदर मात्र असे नव्हते. म्हणूनच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये वितुष्ट का आलं होतं? या दोघांमधील संघर्षाच नेमकं काय कारण होतं? तेच जाणून घेऊयात
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक काका पुतण्यांच्या नात्यांमध्ये वितुष्ट आहे. असंच काहीस वितुष्ट धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये देखील आलं होतं. तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा नवा संघर्ष बीडच्या लोकांना पाहायला मिळाला. पण या संघर्षाला नेमकी सुरुवात कुठून झाली होती? त्याच काय कारण होतं ते पाहुयात.
पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर धनंजय मुंडे हे पंडितराव मुंडे यांचे पुत्र. गोपीनाथ मुंडे व पंडितराव मुंडे हे दोघे सख्खे भाऊ . त्यामुळे नात्याने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकमेकांचे चुलत भाऊ बहीण आहेत. मात्र असं असून देखील 2023 पर्यंत या दोघांमध्ये देखील मोठा संघर्ष पाहायला मिळत होता.
गोपीनाथ मुंडे तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव होतं. गोपीनाथ मुंडेंच्याच हाताखाली धनंजय मुंडे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. रेनापुर या मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे हे आमदार होते. त्यानंतर 2008 साली हा मतदारसंघ विस्थापित करून परळी मतदार संघ स्थापन झाला. तर 2009 ला गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच ठरवलं आणि ते लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे आता गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतील या मतदारसंघावर कोणते मुंडे निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तर धनंजय मुंडे परळी मधून निवडणूक लढवतील असं अनेकांचे मत होतं. पण झालं काहीतरी वेगळच. गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली.
पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे यांना संपूर्ण राज्याचा राज्यकारभार पहावा लागायचा त्यासोबतच तेव्हा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील देखील अनेक पक्षाची कामे ते करत. त्यामुळे या सगळ्या कामाच्या व्यापात गोपीनाथ मुंडे यांना स्वतःच्या मतदारसंघात फारसा वेळ द्यायला जमायचं नाही. पण त्यांच्या उपरोक्त या काळात धनंजय मुंडे मतदारसंघातील काम पाहायचे. धनंजय मुंडे असल्याने गोपीनाथ मुंडे यांना देखील त्यांच्या मतदारसंघाची फारशी काळजी करावी लागत नव्हती. त्यामुळे लोकांच्या मनात नकळतपणे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांची छबी निर्माण झाली होती आणि तसेच काहीशी आशा धनंजय मुंडे यांना देखील लागून राहिली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी 2009 साली परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
या काळात धनंजय मुंडे हे भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आशा कुठेतरी धनंजय मुंडे यांना देखील लागून राहिली होती. मात्र प्रत्यक्षात त्याच्या काहीतरी विपरीतच घडले. त्यामुळे धनंजय मुंडे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण तरी देखील त्यांनी तेव्हा भाजपा सोडली नाही. ते भाजपामध्येच राहिले मात्र जशी जशी 2014 ची विधानसभेची निवडणूक जवळ येत होती, तस तशी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना तिकीटाची आशा लागून राहिली होती. मात्र यंदा देखील आपल्याला तिकीट मिळणार नाही असे संकेत मिळायला लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात भाजपा सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सगळी गणितं बदलली. तिकीट नाकारल्यामुळे आधीच धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्या नात्यात कडवटपणा आला होता. त्यात धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नात्यामध्ये अजूनच दुरावा आला. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देखील हा संघर्ष चालू राहिला, फक्त गोपीनाथ मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष परळीकरांना पाहायला मिळाला.
तर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यामध्ये हा संघर्ष चालू असताना देखील परळीतील जनतेला कुठेतरी या मुंडे भावा बहिणीने एक यावं असं वाटत होतं. पण तसं काहीच घडत नव्हतं. अखेर परळीकरांची ही इच्छा पूर्ण झाली. महायुती सरकारमुळे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र आलेले पाहायला मिळाले. एवढच नाही तर या सोबतच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली. पंकजांच्या निवडणुक प्रचारासाठी धनंजय मुंडे स्वतः उपस्थित होते तर धनुभाऊंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे स्वतः उपस्थित होत्या.
साधारणतः 2013 पासून चालू झालेला मुंडे भावा बहिणींमधला हा संघर्ष आज कुठेतरी संपलेला दिसत असला, तरी देखील हा संघर्ष फक्त नावापुरता राजकीय तळजोडी मुळे मिटला आहे का? असा प्रश्न आजही अनेकांना सतावत आहे. तर तुमच्या मते धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यामधील वाद खरोखरच मिटला आहे का? फक्त महायुती सरकारमुळे राजकीय तडजोड म्हणून ते एकत्र आहेत ते कमेंट करून नक्की सांगा