कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील ईशाना सोसायटीमध्ये सर्व्हे नं. ७७/२ येथे पालिकेची १०७१.७७ चौ.मी जागा असून सदर ठिकाणी अतिक्रमण केले होते. पालिकेच्या ताब्यात जागा असून तसा पालिकेने फलक देखील लावलेला आहे. परंतू जागेच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने येथे अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते. याबाबत बातम्या.इन ने वृत्त प्रसिध्द करताच पालिकेने सोसायटीला नोटीस बजावली असून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत.
जागेचे भाव वाढत असून गगनाला भिडले आहेत. कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी येथे ईशाना सोसायटी आवारात असलेली १०७१.७७ चौ.मी म्हणजे साधारण ११ गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मोठी जागा असून लोकाभिमुख प्रकल्प चांगलाच विकसित होऊ शकतो. परंतू सध्या येथे वाहने पार्किंग होत असून तसेच जागेला सुरक्षाभिंत नसल्याने जागा नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे समजणे कठीण आहे. खाजगी बांधकाम व्यावसायिक येथे पुनर्विकास करण्याचे काम सुरू करत असून पालिकेची जागा सोसायटीच्या जागेमध्ये समाविष्ट करत त्यांनीच हे पत्र लावले आहेत अशी चर्चा कोथरूड परिसरात रंगली आहे.
सदर जागेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच पालिका मालमत्ता व्यवस्थापन विभाग खडबडून जागे होत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ईशाना -३ सोसायटीचे चेअरमन यांना नोटीस बजावली असून स.नं ७७/२ या ठिकाणी अमिनिटी स्पेस/जागा पुणे महानगर पालिकेच्या मालकीची जागा तात्काळ मोकळी करून द्यावी असा आदेश देण्यात आला आहे. सदर जागा मोकळी केली नाही तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
पुणे शहराचे भाजयुमो सरचिटणीस दुष्यंत मोहोळ म्हणाले की, चांदणी चौकापासून जवळच असलेल्या उजवी भुसारी कॉलनी येथे दहा गुंठे जागा असून सदर जागा पालिकेच्या ताब्यात देखील आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता पालिकेच्या सुविधा वाढविणे आवश्यक आहे. सदर जागेवर नागरिकांच्या हितासाठी चांगला प्रकल्प किंवा वास्तू उभारता येऊ शकते. पालिकेच्या जागेला सुरक्षाभिंत असणे आवश्यक आहे, ती असली असती तर अतिक्रमण झाले नसते. पालिकेकडे सुरक्षाभिंत बांधण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही लोकवर्गणी गोळा करून पालिकेकडे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी निधी देऊ.