भारतामध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) चा पहिला रुग्ण सापडला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली असून, सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
HMPV व्हायरस म्हणजे काय?
HMPV म्हणजे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस. हा एक प्रकारचा श्वसनासंबंधी व्हायरस आहे जो प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर परिणाम करतो.
भारतातील पहिला रुग्ण
हा व्हायरस याआधी चीनमध्ये आढळत होता, मात्र आता भारतातही त्याचा पहिला रुग्ण नोंदवला गेला आहे. बंगळुरूमधील आठ महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे, या बाळाने कोणताही प्रवास केलेला नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवरही या व्हायरसच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क
या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये या व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने एक विशेष बैठक घेतली होती. भारतातही अशा प्रकारच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा मंत्रालयाचा दावा आहे.
HMPV व्हायरसबाबत अधिक सतर्कता आवश्यक
या घटनेने नागरिकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, आणि लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.