आजकाल अनेक लोकांच्या दिनचर्येत घाईघाईने जेवणे हे एक सामान्य रिवाज बनले आहे. ऑफिसची धावपळ, घरातील कामकाज आणि इतर कारणांमुळे जेवणाच्या वेळी घाई होऊ शकते. पण, या घाईघाईने जेवण्यामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम अनेकदा अनवधानाने दुर्लक्षित होतात. काही लोक १० मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळात जेवण करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, ही सवय शरीरासाठी किती घातक ठरू शकते याची समजून घेणे महत्त्वाचे आहे.
शरीरावर होणारे दुष्परिणाम
अशा वेळी शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांचे शोषण नीट होऊ शकत नाही. इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, ‘टोन ३० पिलेट्स’च्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ आश्लेषा जोशी यांनी सांगितले की, “जेवण घाई घाईने केल्याने पचन प्रक्रियेत अडथळे येतात. घास नीट चावला जात नाही आणि त्यात लाळ मिसळली जात नाही, ज्यामुळे अन्नाचे पचन योग्य रितीने होत नाही.” यामुळे अपचन, पोटफुगी आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांचे कमी शोषण होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
अतिरिक्त प्रभाव – छातीत जळजळ आणि अस्वस्थता
जेव्हा आपल्याला जलद अन्न खाण्याची सवय लागते, तेव्हा पचन क्रियेत अडथळे येतात. कन्सल्टंट डायटिशियन आणि प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांच्यानुसार, “घाईघाईने जेवताना अन्न नीट चावलं जात नाही आणि पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.” त्यामुळे खाल्ल्या नंतर अस्वस्थता जाणवते आणि दीर्घकाळापर्यंत हे आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
चयापचय प्रक्रियेत व्यत्यय आणि अतिरिक्त वजन
शरीराची पचन क्रिया आणि चयापचय एकमेकाशी संबंधित आहे. जेव्हा आपण खूप जलद जेवतो, तेव्हा आतडे आणि मेंदू यांच्यातील संवाद विस्कळित होतो. परिणामी, ‘लेप्टिन’ सारखे हार्मोन्स जे पोटभरल्याचा संकेत देतात, त्यांचे कार्य योग्य वेळेवर होत नाही. यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते आणि कालांतराने वजन वाढू शकते. दीर्घकालीन काळासाठी ही सवय चयापचय सिंड्रोम आणि लठ्ठपणा यासारख्या आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, जेवण चांगल्या प्रकारे आणि सावकाश घेतल्यास पचन प्रक्रियेत मदत होते, पोषक तत्त्वांचा शोषण होतो आणि शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात. यासाठी, वेळ घेतल्याने आरोग्याला फायदे होतात आणि अधिक संतुलित जीवनशैली बनवता येते.