‘आरे’वरून कुरघोडीचं राजकारण?

आरेमध्येच मेट्रो कारशेड होणार हे शिंदे-फडणवीस सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आरेमध्ये मेट्रो कारशेडचे काम जोरात सुरु होणार आहे यात शंकाच नाही. दरम्यान शिंदे सरकारविरोधात पर्यावरणवादी आक्रमक झाले असून आरे वाचविण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेवर ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा आहे. या मनपामधील वृक्ष प्राधिकरणाने आरेमधील झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. त्यांनतर एका रात्रीत २७०० झाडांची कत्तल करण्यात आली. हे सगळं रात्री घडलं आणि जसे पर्यावरणवादींना हे समजले त्यांनी आरेकडे धाव घेत आंदोलन केले होते. तिथूनच आरे वाचवा या मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली.
आरेमधील वृक्षतोड आणि मेट्रो कारशेडला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध आहे. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत आल्यावर आरेला जंगल म्हणून घोषीत करणार असे म्हणत भाजपला इशारा दिला होता. मेट्रो कारशेडप्रकरणी हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवताच वृक्षतोड करण्यात आली होती. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच वृश्र तोड झाल्यामुळे स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांनी राज्य सरकार, मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.