राजू श्रीवास्तव यांनी प्रेमासाठी १२ वर्षे केला संघर्ष !

अभिनेते, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ४० दिवसांपासून त्यांची झुंज सुरु होती पण ती अपयशी ठरली. विनोदाचं अचूक टाईमींग यामुळे राजू श्रीवास्तव यांचे विनोद कायम लक्षात राहतात.  अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिलेली आहे.

राजू श्रीवास्तव यांना त्यांचे खरे प्रेम मिळविण्यासाठी १२ वर्षे संघर्ष करावा लागला होता. त्यांची रिअल लाईफ लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी लव्ह स्टोरीसारखीच आहे. १२ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळालं होतं. शिखा हे राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव तिचा होकार मिळवण्यासाठी राजू श्रीवास्तव १२ वर्षे थांबले होते. भावाच्या विवाह सोहळ्यात त्यांची भेट शिखाबरोबर झाली आणि पहिल्या नजरेतच त्यांचे शिखाशी प्रेम झाले होते.

कानपूरच्या बाबूपुरवा इथे राहणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव आहे. तसं पाहिलं तर शिखा त्यांच्या नात्यातलीच होती. पण प्रेमाची गोष्ट तिला ते पटकन सांगू शकले नाहीत.आधी त्यांनी शिखाची माहिती घेतली.  शिखाच्या घराबाबतही त्यांनी माहिती मिळवली. आपल्या भावाला आणि बहिणीला याबद्दल आधी सांगितलं.राजू कधी काही कारण काढून आपल्या भावाला घेऊन शिखा राहत असलेल्या इटावामध्ये जात होते. पण शिखाला काहीही सांगण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. 

याचदरम्यान राजू १९८२ मध्ये मुंबईत आले. मुंबईतही नाव कमावण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर काही वर्षात राजू इथे सेटल होऊ लागले आणि आता लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राजू शिखाशी पत्राद्वारे संपर्कात राहायचे पण थेट कधी बोलणं झालं नाही.शिखानेही कधी खुलेपणाने तिचं उत्तर दिलं नाही. यादरम्यान राजू शिखाचं कुठे लग्न जमलं की नाही याबाबतही माहिती घेत राहिले. अखेर एक दिवस त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने शिखाच्या घरी याबाबत बोलणी केली. त्यानंतर शिखाचा भाऊ मलाडमध्ये त्यांचं घर पाहण्यासाठी आले. इथेच त्यांचं लग्नही ठरलं. त्यानंतर १७ मे १९९३ मध्ये राजू आणि शिखा यांचं लग्न झालं. या दोघांची अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुलं आहेत.अशी ही राजू श्रीवास्तव यांची प्रेमकथा आहे. 

राजु श्रीवास्तव यांच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. सोशल मीडियावरुन त्याला त्याच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजु केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.