‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभु ! ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर पाहाच

‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आज ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले त्यात एका दमदार अभिनेत्याच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा अभिनेता आहे शरद केळकर जो ‘हर हर महादेव’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
हर हर महादेव ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा महामंत्र होता. हा महामंत्र जपतच बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडखिंड लढवली आणि आपल्या प्राणाची आहूती दिली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे.आज रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टर आणि त्यातील संवाद अंगावर शहारे आणतात. हर हर महादेव हा सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधूनही रिलीज होणार आहे.