बाळासाहेबांनी तयार केलेलं ‘ते’ पद आदित्यला मिळणार?

शिवसेनेने आत्तापर्यंत अनेक बंड पाहिलेले आहेत पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. अगदी शिवसेना कोणाची आहे हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. शिंदेच्या बंडामुळे ५५ पैकी ४० आमदार आणि संसदेतील १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती तोडून थेट काँग्रेस- राष्ट्रवादीला हात दिला आणि महाविकासआघाडीचा जन्म झाला. खरंतर ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने प्रशासकीय पद भुषवलं नव्हतं पण उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत थेट विधानसभेत धडक घेतली. मविआ सरकारमध्ये त्यांच्यावर पर्यावर विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र शिंदेंनी बंड केला आणि मविआ सरकार कोसळलं.
आता शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे जोरदार प्रयत्न करत आहेत. खरी शिवसेने म्हणजे आम्ही असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. त्याचबरोबर उद्धव आणि आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचे काम करत आहेत. खास करुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार पुढाकार घेतलेला पहायला मिळतो आहे. शिवसंवाद यात्रा, निष्ठा यात्रा याच्या माध्यमातून बंडखोरांविरोधात जोरदार टीका केली जाते आहे. गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांन राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहे.
दिवसेंदिवस आदित्य ठाकरे यांच्याभोवतीचे वलय वाढते आहे.त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावर मोठी जबबादारी येण्याची शक्यता आहे.तसेच उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे देखील राजकारणात एन्ट्री मारणार असल्याची शक्यता आहे. याबाबत जोरदार चर्चा राजकारणात सुरु आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील कार्याध्यक्ष पद गोठवून तिथे पक्ष प्रमुख पद निर्माण करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष होते ते पक्षप्रमुख झाले. पण आता शिवसेनेत कार्याध्यक्ष पद निर्माण केले जावू शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांना मिळणार असे बोलले जाते आहे. तुम्हाला आठवत असेल बाळासाहेब ठाकरे यांनी कार्याध्यक्षपद निर्माण केलं होतं जेव्हा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
शिवसेनेत जेव्हा उद्धव आणि राज असे दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झालं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात कार्याध्यक्ष पद आणि त्या पदावर उद्धव ठाकरे यांची निवड हा विषय मांडला होता. तेव्हा सर्व शिवसैनिकांनी अनुमोदन दिलं होतं. त्याचवेळी बाळासाहेबांनी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंना दिली होती. आता उद्धव ठाकरे त्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी जे बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलं होतं ते आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देणार असे बोलले जाते आहे.