आदित्य ठाकरे जेव्हा बंडखोर आमदाराला भेटतात…

शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये आज सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली. उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहाबाहेर पडताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंची भेट सभागृहाच्या दाराशी एका बंडखोर आमदारासोबत झाली. यावेळी दोघांमध्येही प्रसारमाध्यमांसमोरच संवाद झाला.
आदित्य सभागृहाबाहेर पडत असताना त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटले. यावेळी आदित्य यांच्या आजूबाजूला प्रसारमाध्यमांचा गराडा होता. मात्र आदित्य यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत थेट सुर्वेंना भेटले. यावेळी आदित्य ठाकरे सुर्वे यांना, “एवढे जवळचे असून… काय सांगणार आपण मतदारसंघाला? तुम्ही असं कराल असं केव्हाच वाटलं नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं हे तुम्हाला पण माहितीय. मला स्वत:ला याच दुःख झालं हे तुम्हाला पण माहितीय,” असं म्हटलं.
आदित्य आणि सुर्वे यांची ही भेट अवघ्या १२ ते १५ सेकंदांची होती. आदित्य हे सारं बोलत असताना सुर्वे मात्र समोर उभं राहून मान हलवत त्यांच्या बोलण्याला होकार असल्याचं दर्शवत होते. सुर्वे यांनी यावेळी तोंडातून एकही शब्द काढला नाही. नंतर आदित्य पुढे प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी पोडियमकडे निघून गेले. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार आहेत. शिंदे गटासोबत बंड पुकारणाऱ्या ४० आमदारांपैकी ते एक आहेत.