आदित्य यांनी बांधलेला पुल गेला वाहून, मुख्यमंत्री शिंदे आले धावून

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती पहायला मिळते आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे बांधण्यात आलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे पुन्हा एकदा स्थानिकांचे हाल होत आहेत. हा लोखंडी पूल तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे बांधण्यात आला होता.पण काही महिन्यातच पुरामुळे तो वाहून गेलाय. आता हा पुल नव्याने बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. हा पूल तातडीने बांधून तयार करावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिराऱ्यांना दिला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत असे. जेव्हा ही बातमी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना समजली युवासेनेच्या माध्यमातून येथे पूल बांधण्यात आला होता. २८ जानेवारी २०२२ रोजी स्वतः आदित्य ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरला येवून पुलाची पाहणी केली होती. या संदर्भातील व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात हा पूल कोसळला. स्थानिकांनी तात्पुरती लाकडे टाकून नदी पार करण्यासाठी मार्ग तयार केला याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून नदीवर पुन्हा लोखंडी पूल बांधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.