मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला ! या तारखेला होणार शपथविधी….केसरकर म्हणाले,

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांचा शपथविधी होवून एक महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे शिंदे सरकारवर विरोधक रोजच टीका करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलेला आहे. पण आता मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी विशेष माहिती दिली आहे. येत्या रविवारपर्यंत म्हणजे ७ ऑगस्टपर्यंत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा दावा त्यांनी केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी माहिती ही केसरकरांनी दिलेली आहे. त्यामुळे सतत पुढे जाणारा मंत्रिमंडळ विस्तार आता रविवारी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जाते आहे.
एका वृत्त वाहिनीने सुत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळात भाजपमधील ७ तर शिंदे गटातील ५ मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपमधून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना संधी मिळणार आहे. तर शिंदे गटातून गुलाबराव पाटील, उदय सामंत,दादा भुसे शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार ही नावे समोर आली आहेत.