मैदानाचा वाद संपला, आता पार्किंगच्या जागेवरुन शिंदे – ठाकरे गट आमने-सामने

यंदाच्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे.शिवसेनेत पडलेली उभी फूट यामुळे ठाकरे आणि शिंदे गट वेगवेगळा मेळावा घेत आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा प्रथेपरंपरेप्रमाणे शिवाजी पार्क येथे होणार आहे तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर होत आहे.शिंदे गटाचा हा पहिला मेळावा असून त्यात ४ ते ५ लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येतोय. आता हे कार्यकर्ते आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगसाठी शिंदे गटाला मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जागा देण्यात आली आहे.

आता या जागेवरुन वाद पेटलेला आहे. शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा आणि विद्यापीठातील जागा राजकीय पक्षाला देण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात येतेय. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील जागा देणे हा प्रकार विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचा आरोप करण्यात युवासेनेने केला आहे.

शिंदे गटाने सर्व नियम धाब्यावर बसवून पार्किंगसाठी संकुलात असणाऱ्या झाडांवर बुलडोझर फिरवला आहे. एकाही राजकीय वाहनाला विद्यापीठात प्रवेश देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आलाय. राजकीय दबावापोटी संबंधित यंत्रणांकडून हा निर्णय घेतला आहे असा आरोप करत या गोष्टीला परवानगी देऊ नये असे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या ठिकाणी झाडांची कत्तल झालेली नाही. पावसामुळे साफसफाईचे काम सुरु आहे असा खुलासा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. अटी व शर्तींच्या अधीन राहून विद्यानगरीमधील जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचा खुलासा मुंबई विद्यापीठाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.