खूशखबर ! विमानप्रवास झाला स्वस्त !!

तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करायचा असेल तर हीच चांगली वेळ आहे कारण केंद्र सरकारने विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले तिकिट स्वस्त केले आहे. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये चुरस लागलीय. त्यात अनेक कंपन्यांकडून तिकिट स्वस्ताईचा फंडा वापरला जातोय. प्रवाशांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
कंपन्यांमध्ये लागलेल्या चढाओढीमध्ये देण्यात आलेल्या नव्या ऑफरनुसार, मुंबई ते अहमदाबाद फक्त 1,400 रुपयांमध्ये किंवा मुंबई ते बंगळुरू अवघ्या 2,000 रुपये किंवा त्याहूनही कमी किमतीत उड्डाण करू शकणार आहे. हे आता शक्य झाले आहे, कारण विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये किंमत युद्ध सुरू झाले आहे.
गो फर्स्टमधून मुंबई-अहमदाबादचा प्रवास अवघ्या 1399 रुपयांत तर याच मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी Akasa Air कंपनीचे विमान तिकिट 1,497 रुपये इतका आहे. इंडिगो ही देशांतर्गत सर्वात मोठी विमान कंपनी या मार्गावर 1,609 रुपये इतकी तिकिट ऑफर देत आहे. मुंबई ते बंगळुरूचा विमान प्रवासही चांगलाच स्वस्त झाला आहे. या मार्गावर 2,000 ते 2,200 रुपयांच्या श्रेणीत तिकिट उपलब्ध करण्यात आले आहे. Akasa Air ही नवी विमान कंपनी या मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी 1,997 रुपयांचे तिकिट ऑफर करत आहे, तर इंडिगोचे तिकीट 2,208 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने 31 ऑगस्टपासून विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवली आहे. त्यानंतर भारतीय विमान कंपन्यांमध्ये तिकीट दरासंदर्भात युद्ध सुरु होईल अशी अपेक्षा होती. तसेच चित्र सध्या देशांतर्गत विमान मार्गावर दिसतंय. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यांच्यातील स्पर्धेचा देशांतर्गत विमान प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो.