सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचा प्लान बी ठरला?

सुप्रीम कोर्टातील घटनापीठाने जो निकाल दिला त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मात्र त्याचा जोरदार धक्का बसला.आता शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा निकाल निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार आहे हे स्पष्ट झालं असून आता उद्धव ठाकरे यांची पुढची रणनीती काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. हे सर्व सुरु असताना मातोश्रीवर काय घडते आहे याची उत्सूकता सगळ्यांना आहे. दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी १ नोव्हेबरपर्यंत पुढे गेलेली आहे. 

आता शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर खलबतं पार पडलेली आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? हा पेच आता निवडणूक आयोगाच्या दारात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेवू शकतो याच्या तीन शक्यता आहेत. त्या याप्रमाणे आहेत म्हणजे

धनुष्य बाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहणार, शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे येणार किंवा शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवलं जाणार. यापैकी एक निकाल निवडणूक आयोग देवू शकतं. यामध्ये ज्या दोन निकालांची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे ती शिंदे गटाच्या बाजूने आहे. त्याचा फायदा शिंदे गटाला नक्की होईल यात शंकाच नाही पण जर  चिन्ह गोठवलं गेलं तर शिवसेना कुणाची हा संभ्रम निर्माण झालेला आहे तो कायम राहू शकतो. तेव्हा आता धनुष्यबाण चिन्ह जर उद्धव ठाकरेंकडून गेलं तर काय करायचं? याची चाचपणी ठाकरेंकडून सुरू झालेली आहे. आपण आपली ही पहिली निवडणूक आहे असं समजून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं आपल्याला नक्कीच आठवत असेल. त्यात मोठा अर्थ लपलेला आहे. शिवसेनेने त्यांची पहिली निवडणूक १९६७ रोजी त्यांच्याकडे चिन्ह नसताना प्रजा समाजवादी पक्षासोबत लढवली होती. शिवसेनेचे तेव्हा ४२ नगरसेवक निवडून आले होते. तोच लढा आता द्यायचा आहे असा कुठेतरी याचा अर्थ होतो.

दरम्यान शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं किंवा एकनाथ शिंदेंकडे गेलं तर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा झटका बसू शकतो. अशात नव्या पक्षचिन्हासह लढण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे अशी माहिती मातोश्रीच्या सूत्रांनी दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.