छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, मंत्री पद नाकारल्यामुळे छगन भुजबळ यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवली अशा बातम्या सध्या येत आहेत. आणि याच बातम्यांच्या दरम्यान "प्रश्न मंत्री पदाचा नाहीये, माझी अवहेलना झाली" असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केल आहे. म्हणूनच मंत्री पद नाकारण्याआधी देखील छगन भुजबळांची नेमकी कोणी आणि कशी अवहेलना केली? तेच जाणून घेऊया
आजवर अनेक मंत्रीपदे आली आणि गेली, प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये. या प्रकारे जी वागणूक दिली जाते, व अपमानित केलं जात त्याने मी दुखी आहे.” प्रश्न मंत्रिपदाचा नाही, माझी अवहेलना केली. असं म्हणत छगन भुजबळांनी त्यांच्या नाराजीचे कारण सांगितले आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून छगन भुजबळांची नाराजी नाहीये, तर सर्वात ज्येष्ठ आमदार, व नेते असूनदेखील छगन भुजबळांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने ते नाराज आहेत. पक्षाने त्यांचा अपमान केला आहे असे त्यांचे म्हणणे असून माझी अवहेलना का केली? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. म्हणूनच छगन भुजबळांची कशी अवहेलना करण्यात आली ते पाहुयात.
२०२४ लोकसभेसाठी छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देखील तुमच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे असं सांगून छगन भुजबळांना तिकिटाच आश्वासन अजित पवार व सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलं होत. त्यानुसार जवळपास महिनाभर छगन भुजबळांनी निवडणुकीची तयारी केली. पण या काळात पक्षाकडून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आले नव्हते, आणि तिकीट वाटपात केलेल्या या दिरंगाई मुळे भुजबळ नाराज झाले, पुढे जागावाटपाच्या चर्चेत झालेल्या गोंधळानंतर, अजित पवारांनी शिवसेनेच्या हेमंत गोडसें साठी ही जागा सोडली आणि भुजबळांना माघार घ्यावी लागली. आधी तिकिटाच आश्वासन देऊन ऐनवेळी तिकीट नाकारून राष्ट्रवादीने इथेच भुजबळांची पहिल्यांदा अवहेलना केली.
लोकसभेनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी शोधाशोध चालू होती. यावेळी लोकसभेत संधी नाकारलेल्या भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी एक जागा बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली तर दुसरी जागा १५ तारखेला राष्ट्रवादी कडून शपथ घेतलेल्या मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना देण्यात आली होती . कारण त्यांना खासदार करण्याचं वचन अजित पवारांनी त्यांना दिलं होत. प्रत्यक्ष पाहता भुजबळ नितीन पाटलांपेक्षा जास्त ज्येष्ठ, त्यांचा अनुभव देखील दांडगा पण तरीही त्यांना डावलून नितीन पाटलांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. आणि इथे राष्ट्रवादीने छगन भुजबळांची दुसऱ्यांदा अवहेलना केली.
विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ येवल्यातून विजयी झाले, तर ३० ते ३२ जागा जिंकू अशी आशा असणाऱ्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. महायुती सरकारने देखील या निवडणुकीत न भूतो, न भविष्यती असा विजय मिळवला. महायुतीच्या या विजयामागे माधव अर्थात ओबीसी फॅक्टर ने मोठी भूमिका बजावली. महायुतीला ओबिसि प्रवर्गाची हि साथ मिळण्यामागे कारण होते भुजबळ. भुजबळांनी ओबीसींचा मुद्दा सातत्याने लावून धरला. त्यावेळी भुजबळांच्या भूमिकेचा फायदा महायुतीने करून घेतला. पण त्यांना मंत्रिमंडळातून मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, आणि भुजबळांची पुन्हा एकदा यावेळी तिसऱ्यांदा अवहेलना झाली.
जेव्हा लोकसभा हवी होती तेव्हा दिली नाही, पुढे राज्यसभा हवी होती तीही नाकारण्यात आली. त्यानंतर आता मंत्री मंडळातून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याचं नुकसान भरून काढायला राज्यसभेची ऑफर देण्यात आली. एकूणच हा सर्व घटनाक्रम पाहता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांची अवहेलना झाल्याचं पाहायला मिळत. “तर मी काय तुमच्या हातातला खेळणं आहे का?” असं म्हणत छगन भुजबळ यांनी देखील या सगळ्यावर टीका केली आणि त्यांना मिळालेली राज्यसभेची ऑफर नाकारली आहे.
“निवडणुकीसाठी छगन भुजबळ साहेबांचा वापर करून घेतला. त्यांच्याकडून होणारा फायदा संपल्या नंतर आता मंत्रिमंडळातून त्यांची उचल बांगडी करण्यात आली. राष्ट्रवादीने स्वार्थीपणा करत छगन भुजबळ साहेबांचा फक्त वापर करून घेतला” असं मत छगन भुजबळांचे समर्थक व्यक्त करत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीने खरंच छगन भुजबळांची अवहेलना केली का? भुजबळांना मंत्री पद न देऊन राष्ट्रवादी चुकली का? ते कमेंट करून नक्की सांगा