फक्त शुभेच्छा का राजकीय चर्चा? शरद पवारांच्या भेटी मागचं राजकारण! NCP
शरद पवारांचा आजचा वाढदिवस भेटीगाठीच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजला आहे. शरद पवारांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या, पण यातील अजित पवारांनी, शरद पवारांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सध्या चर्चेत आहेत. दहा दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज अजित पवार, सुनेत्रा पवार, यांच्या सोबत राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे व छगन भुजबळ यांनी सहा जनपथ येथील शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ज्यावरून दोन्हीही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणूनच आज नेमकं काय झालं? आणि या भेटीगाठीं मागे नेमकं काय कारण होतं? त्यांचं राजकीय महत्व काय आहे? तेच जाणून घेऊयात
आज अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व छगन भुजबळ हे सर्व एकत्र शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. तर त्यांच्या स्वागतासाठी स्वतः सुप्रिया सुळे देखील तिथे उपस्थित होत्या. तर जवळपास 35 मिनिटे शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये यावेळी चर्चा देखील झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती, त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये आलेल्या शरद पवारांच्या वाढदिवसा वेळी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटणं टाळलं होतं, यासोबतच दरम्यानच्या काळात अनेक कार्यक्रमांवेळी अजित पवार व शरद पवार दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र तेव्हा या दोघांनी एकमेकांशी संवाद साधनं टाळलं होत. त्यामुळे या वाढदिवसाला अजित पवार व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मागील दहा दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या निवासस्थानी गेले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर केंद्रातील नेत्यांशी समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांनी याकाळात निभावली होती, त्यामुळे प्रफुल्ल पटेल व शरद पवार यांच्या भेटीनंतर झालेली अजित पवार व शरद पवारांची आजची भेट विशेष महत्त्वाची मानली जात असून, ही भेट अनेक नव्या राजकीय बदलांची नांदी देखील ठरू शकते असा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात.
शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून अजित पवार यांनी “शरद पवार व प्रतिभा काकी यांचे दर्शन घेतले, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासोबत इन जनरल गप्पा मारल्या” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व सुनील तटकरे यांनी “भेट झाली, चांगलं वाटलं, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले” या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चार डिसेंबरला पार पडलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातील खासदारांच्या बैठकीत खासदारांनी महायुती सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासोबतच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे, ज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे खासदारांची संख्या जास्त आहे, तर अजित पवार गटाकडे आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता शरद पवार यांची अजित पवारांनी घेतलेली ही भेट राजकारणात काय बदल घडवणार का? हे पहाव लागेल.
तर यावर तुमचे मत काय? या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा…