विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे?

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेन दावा केला आहे तर काँग्रेसनेसुद्धा विरोधी पक्षनेते आम्हाला मिळावे अशी मागणी केली आहे. विधानपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समान संख्या आहे तर शिवसेनेचं संख्याबळ दोनने जास्त आहे. विधान परिषदेत सभापती पद रिक्त आहे. दरम्यान उद्या ( ९ ऑगस्ट) विधान परिषदेच्या कामकाजाबाबत बैठक आहे त्यात सरकारची भूमिका विचारल्यानंतर पुढील निर्णय होणार असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या वृत्त वाहिन्यांवर दिल्या जात आहेत. वास्तवात मंत्रिमंडळ विस्तार असेल तर मुख्य सचिवाकडून विरोधकांना निमंत्रण दिलं जातं. नंदनवनवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठक झालीय त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जाते आहे पण अधिकृत निमंत्रण आलेले नाही असेही पवार म्हणालेत.
उद्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे.त्याबद्दल आम्हाला कळविण्यात आलेले आहे. पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजून कळवलेलं नाही, सरकारमधील विविध सहकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आलंय त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे असेही अजित पवार म्हणाले.
शिंदे सरकार आल्यानंतर विधानसभेत संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते देण्यात आलंय. मात्र विधानपरिषदेत सभापती, विरोधी पक्षनेते दोन्ही रिक्त आहेत. तिथे शिवसेनेने दावा केलेला आहे.
शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा आहे. विधान परिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे १० सदस्य तर शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. त्यात उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी काँग्रेसनंसुद्धा केलेली आहे.