एकीकडे भाजपचं मिशन बारामती, तर दुसरीकडे पार्थ पवार ‘वर्षा’ बंगल्यावर

यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात राजकीय गाठीभेटी जास्तच वाढल्या आहेत असे म्हणायला हवं. आज एक घटना अशी घडली आहे ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बाप्पांच्या दर्शनाला पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशोत्सव काळात घरोघरी जावून अनेक कार्यकर्त्यांचे समाधान केले तसेच अनेक राजकीय नेते, उद्योगपती यांच्या घरीसुद्धा गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री जात होते यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. त्या टिकेला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता अजित पवारांचे चिरंजीवच वर्षावर गेल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर, अभिनेता नाना पाटेकर यांच्याही घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, इकडे वर्षा बंगल्यावर पार्थ पवार यांनी सायंकाळी अचानक भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन पार्थ यांनी घेतले. यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. कधी कधी ट्विट करत असतात पण २०१९ मध्ये मावळ मतदारसंघात लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर ते फारसे राजकारणात दिसत नाहीत.मात्र वर्षावरील त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आलं आहे.