अमरावती हत्या प्रकरण, मास्टरमाईंडला बेड्या

देशात खळबळ उडवणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असं त्याचं नाव असून तो एक एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते.
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले.आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली हे विशेष.
या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण हिदायात खान (25), अब्दुल तौफिक शेख तसलीम (24), शोएब खान साबीर खान (22), आतिब रशीद आदिल रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आता यामध्ये मास्टरमाईंड इरफान खान याचा समावेश झाला आहे.