ठाकरेंच्या सेनेला धक्का ! केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल

राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना घडत असताना एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातमीने खळबळ माजली आहे कारण गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती.केदार दिघे यांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून शिंदेना घेरायचा प्रयत्न केला होता. ठाण्याच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण करण्यासाठी केदार दिघे यांच्याकडे सर्वात सक्षम पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. ठाण्यातील नगरसेवक शिंदेंना पाठिंबा देत असताना आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली होती. उद्धव ठाकरे यांची ही महत्त्वाची राजकीय खेळी मानली जात होती पण दिघेंच्या विरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिलेला आहे मात्र केदार दिघे यांच्या गुन्हा दाखल झाल्यामुळे आता प्रकरणाला राजकीय रंग नक्कीच चढणार.आहेत. दिघेंवर आता कोणत्याही क्षणी कारवाई होवू शकते अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान आजच केदार दिघे यांनी एका वेगळ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देणारे ट्विट केले होते. त्यात हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल,दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल असे म्हटले होते.संजय राऊत यांना झालेली ईडीची कोठडी आणि आता केदार दिघे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला आहे.