आनंद दिघेंची ‘ती’ रिकामी खुर्ची शिवसेनेच्या शाखेत, आजही आहे कारण

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. लोकांसाठी जगणारा, निःस्वार्थ मनाने त्यांची सेवा करणारा एक लोकनेता म्हणून आनंद दिघे यांचे नाव आजही घेतले जाते. ठाणे आणि आनंद दिघे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू ! आजही ठाण्यात आनंद दिघे यांना सर्वोच्च स्थानी मानले जाते. ठाणे हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण त्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनविण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा आहे. हे एक व्यक्तीमत्व नाही तर एक संस्थान होतं असं म्हटलं तरी चालेल. घरच्या परिस्थितीमुळे आनंद दिघे यांना कॉलेजचे शिक्षण पूर्ण करता आले नाही पण मुलांनी शिकायला हवे यावर त्यांनी विशेष भर दिला. स्वतःचं घरदार सोडून हा लोकनेत काम करायचा. आनंद दिघे यांनी एकदाही निवडणूक लढवली नाही पण आपलं जीवन लोकसेवेसाठी समर्पीत केलं.
ठाणेमधील टेंभी नाक्याच्या शाखेतून आनंद दिघे कार्य करत होते. टेंभी नाक्याच्या त्या शाखेत आनंद दिघे ज्या खुर्ची बसत ती खुर्ची आजही तशीच ठेवलेली आहे. या खुर्चीबसून आनंद दिघे यांनी लोकसेवा केली. मराठी माणसाला न्याय मिळवून दिला. शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जेव्हाही या शाखेत येतात त्यावेळी ते बाजूच्या खुर्चीत बसतात.
आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कधीही कोणी केली नाही आणि भविष्यातही करणार नाहीत, कारण त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशी भावना तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.आनंद दिघे यांना जावून २१ वर्षे झाली तरी त्यांच्याबद्दल अनेक वादाचे मुद्दे आहेत पण त्यांनी केलेली कार्ये लोकांनी जवळून पाहिलेली आहेत.त्यामुळे आजही आनंद दिघे यांचे नाव आदराने घेतले जाते.