ठाकरेंचा विजय, तर शिंदे सरकारला सलग दोन दणके!!

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टाने लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत तसेच या प्रकरणी कोर्टाने मनपाला खडेबोल सुनावलेत. मुंबई हायकोर्टाच्या निकालामुळे पेचात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय. तर शिंदे गटासाठी हा दुसरा झटका आहे अशी चर्चा सुरु झालीय.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लटके यांनी महापालिकेकडे लिपिक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दोन राजीनामे दिले होते त्यातील दुसार राजीनामा ३ ऑक्टोबर रोजी सादर केला. तरी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जात नव्हता अखेर त्यांनी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.न्यायमूर्ती जमादार यांच्या खंपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी दोन्ही महापालिका प्रशासनाचे वकील आणि ऋतुजा लटके यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल असल्याचे मनपाच्या वकिलांकडून सांगण्यात आले. तर ऋतुजा लटकेंच्या वकिलांनीही काही मुद्दे उपस्थित करत महापालिकेच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ‘मुंबई महापालिकेला विशेषाधिकार वापरण्याचा अधिकार आहे पण ऋतुजा लटकेंच्या प्रकरणात महापालिकेचा हेतू योग्य दिसत नाही असे कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे. तसेच महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जाते आहे.जर एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होतं असे कोर्टाने महापालिकेला सुनावले.