ऋतुजा लटकेंना शिंदे गटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष पेटला आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पण आता त्यांनाच गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत असे समजते आहे. ऋतुजा लटके एकदा ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आल्या की त्यांनाच उमेदवारी द्यायची अशी शिंदे गटाची योजना आहे. भाजपने मुरजी पटेल यांचा मतदारसंघात प्रचार सुरु केलाय पण शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पर्याय शिंदेंकडून खुले ठेवण्यात आलेत.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबर रोजी संपते आहे.तेव्हा शेवटच्या दिवसात काही चमत्कार घडणार का हे पहावं लागणार आहे. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्यामुळे त्यांची बाजू भक्कम आहे. पण आज जर रमेश लटके हयात असते तर ते आपल्याबरोबरच आले असते असा शिंदे गटाचा दावा आहे.
दरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतुजा लटके या मुंबई पालिकेच्या अंधेरी येथील के/पूर्व कार्यालयात सेवेत होत्या. आता त्यांनी पालिका सेवेचा राजीनामा दिलाय पण त्यांचा राजीनामा अर्ज मंजूर झालेला नाही. जोपर्यंत त्यांचा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या उमेदवारी अर्ज भरू शकणार नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर होवू नये यासाठी शिंदे गटाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर दबाव टाकला जातोय असे समजते आहे. आता यातून मार्ग कसा निघणार ते आज समजेलच.