अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव होईल का? काय म्हणतात तज्ज्ञ?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि नवे चिन्ह मिळालेले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटाकडून दिवसरात्र एक करुन कठोर मेहनत घेतली जात आहे. एकूणच ही निवडणूक म्हणजे शिंदे आणि ठाकरेंसाठी आरपारची लढाई आहे.त्यात नवं नाव आणि नवं चिन्ह दोन्ही गटाला मिळालेलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून हा तात्पुरता निर्णय देण्यात आला असला तरी या निर्णयाचा मोठा धक्का ठाकरेंना बसलाय हे नाकारता येत नाही. कित्येक दशकं ‘मराठी माणूस’ या मुद्द्यावर लढणाऱ्या शिवसैनिकांना आता या मुद्द्यावर पाणी सोडावं लागणार आहे असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलंय.
बाळासाहेब ठाकरे यांनी जो वटवृक्ष उभा केला होता त्याचे दोन तुकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे झालेले आहेत, असे कुर्ला येथील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नवं चिन्ह आणि नवं नाव देत निवडणूक आयोगाने जणू काही शिवसेनेतील फुटीला एकप्रकारे मंजुरी दिलेली आहे. निवडणुकी आधीच ठाकरे गटात एक गोंधळ उडालेला पहायला मिळतोय. अनेक पेच, अनेक संकटे उभी राहत आहेत त्यामुळे फक्त अंधेरी पोटनिवडणूकच नाही तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही शिंदे आणि ठाकरे गटासाठी पहिली परीक्षा आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात लागलेली ती पहिली निवडणूक आहे. ही जागा ठाकरे गटाने कायम राखल्यास भाजप आगामी मुंबई, ठाणे आणि इतर महापालिकांच्या निवडणुका या मार्चपर्यंत पुढे ढकलू शकतो असे मत राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ यांनी व्यक्त केलंय. पण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचा जर पराभव झाला तर काय होईल? त्यानंतर ठाकरेंच्या पक्षाची किती हानी होईल? असे प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.
शिवसेनेला बंडखोरी नवी नाही पण शिंदेंच्या बंडखोरीतून एक लक्षात आलं ते म्हणजे गट प्रमुख आणि शाखाप्रमुखांपेक्षा पक्षाचे पदाधिकारी शक्तिशाली झाले. तळागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ही बंडखोरी झाली. त्यात एकनाथ शिंदे यांचा पक्षातील तळागाळाच्या कार्यकर्त्यांशी जबरदस्त संपर्क होता आणि आहे. तेव्हा शिवसेनेसाठी आता अटीतटीचा सामना असून ती वादळाला नक्की तोंड देईल असे मत शिवसेनेचा इतिहास जाणणारे विजय वैद्य म्हणाले आहेत.
तर प्रकाश बाळ यांच्या मते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे मोठ्या जागांनी विजय होईल आणि त्यामुळे आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेला अधिक बळ मिळेल. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील सभेतून रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरलाय. आता आगामी काळात काय होते ते लवकर समजेलच.