उपवास करा मात्र या १० गोष्टी नक्की वाचा !

आषाढी एकादशीपासून सुरू होणारे उपवास श्रावण महिना, गौरी-गणपती, नवरात्र असे करत पुढील काही महिने चालतात. या काळात पावसाळा असल्याने अग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे शरीराला आराम देण्यासाठी या उपवासांचे नियोजन असते असे म्हटले जाते. उपवासाचे शरीराला फायदे होतात असे म्हटले जाते. पण त्याबरोबरच कडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थांचे जास्त सेवन झाल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणून उपवास करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा.

१. गर्भवती महिला, दिवसभर कष्टाचे काम करणारे लोक, ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह किंवा इतर आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे.

२. उपवास केला तरी तो योग्य पद्धतीने खाऊन करायला हरकत नाही. निरंकारी किंवा निर्जल उपवास करणे टाळावे, त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

३. केवळ पाणी पिऊन उपवास किंवा केवळ फळे खाऊन उपवास असे प्रयोग अनेक जण करताना दिसतात. यामुळे स्वत:वर ताबा राहण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यासही त्याचा फायदा होतो असे अनेकांचे मत असते. मात्र तज्ज्ञांचा सल्ला न घेता अशाप्रकारे केलेले उपवास आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.

४. उपवासाला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा खाल्ला जातो. साबुदाणा हा प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून काही अपाय होत नाहीत. मात्र प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणा खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ असल्याने तो पचायला काही प्रमाणात जड असतो. तसेच साबुदाण्यातून शरीराला आवश्यक असणारे कोणतेही घटक मिळत नाहीत. त्यामुळे शक्य असल्यास साबुदाणा खाणे टाळावे.

५. उपवासाच्या अनेक पदार्थांमध्ये दाणे प्रामुख्याने वापरले जातात. मात्र दाणे हा काही वेळा पित्तासाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. तसेच दाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे दाणे खाताना काळजी घ्यायला हवी.

६. शिवरात्रीच्या दरम्यान उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, शहाळे, नीरा अशी पेये आवर्जून घ्यावीत. त्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

७. रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध हे उपवासाला चालणारे काही आरोग्यदायी पदार्थ आहेत, त्यांचा आहारात जरुर समावेश करावा.

८. उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे करणे टाळावे.

९. तुम्हाला कोणती औषधे सुरू असल्यास उपवास करताना डॉक्टरांचा य़ोग्य तो सल्ला घ्यावा अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

१०. उपवासाच्या आधी आणि त्या दिवशी खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.