राज्यावरील दु:ख, संकट दूर होवो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं

आषाढी एकादशीचा राज्यभर उत्साह पहायला मिळतो आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो, कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्यातील बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याला कृषी, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात चांगलं यश मिळो अशी प्रार्थना आहे. माझ्यासाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. हा दिवस मी कदापि विसरु शकणार नाही. राज्याच्या जनतेसाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी करेन, असंही ते म्हणाले. वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असंही शिंदे म्हणाले. माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यासांठी पंढरपूरचा विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. हा पांडुरंग सर्वसामान्यांचा देव आहे. यासाठी जे काही लागेल ते शासन देईल, असं शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडतोय. कुठंही जीवितहानी होऊ नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या राज्याचा विकास करण्यासाठी आपण चांगल्या योजना राबवू. केंद्र सरकार देखील राज्याच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे, असं ते म्हणाले.कोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यंदा मोठा उत्साह असून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले असल्याची माहिती, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.