एकदा तरी जावे पंढरी……

‘पंढरपूर’ फक्त नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो विठ्ठल…अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी डावीकडे रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ म्हणजे प्रिय आहे असा हा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं दैवत! सकल संतांचं माहेरघर म्हणजे पंढरपूर! पंढरपूरला ‘तीर्थराज’ असंही म्हणतात.‘सावळे सुंदर रूप मनोहर’ असं म्हणत पांडुरंगाची भक्ती करत वारकरी दरवर्षी त्याच्या भेटीला येतात. ऋषी, मुनी, संत महात्मे, तुमच्या आमच्या सारखी साधी माणसे, नित्य वारी करणारे वारकरी यांच्यापासून ते देशी-विदेशी संशोधक, भक्तांपर्यंत सार्यांना या विठ्ठलाने वेड लावले आहे. या लोकप्रियतेचे कारण काय असावे असा विचार करताना असे लक्षात येते की त्याच्या कमालीच्या ‘साधेपणा’वर सारे मोहीत झालेत. हा देव अगदी साधा आहे. तो आपण रांधलेले आवडीने खातो. त्याला पंचपक्वान्ने लागत नाहीत. त्याला सोवळे ओवळे नाही. कर्मकांड नाही. काही दिले नाही तरी कोपत नाही. असा हा साधाभोळा विठ्ठल ! वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचे, वारकऱ्यांचे हे प्रमुख तीर्थस्थान होय.
आता वारकरी संप्रदायाचा नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. तरी संत बहिणाबाईनी आपल्या अभंगात म्हटलंय
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
तथापि पंढरपूरची वारी ही ज्ञानदेवांच्या पूर्वीही चालू होती असंही म्हणतात. पंढरपूर येथे विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आले याचा शोध ही सुरूच आहे. तरी एक कथा नेहमीच सांगितली जाते ती म्हणजे आईवडिलांची परमभक्ती करणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव पंढरपूरला आला, तेव्हा पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता, ती पुर्ण होईतो देवाने थांबावे, अशी विनंती त्याने केली आणि देवाला उभे राहण्यासाठी एक विट फेकली. याच विटेवर कटी कर ठेवून देव विठ्ठलरूपाने उभा राहिलेला आहे, अशी सर्व संतांची श्रद्धा आहे.
वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि विठ्ठल भक्तीत रममाण होतात. पंढरपूर आणि विठ्ठल यांचे नाते अतूट आहे हे खरे पण विठ्ठल येथे कधीपासून आहे?
पंढरीचा विठू तिथं आहे कवाच्यानं।
नव्हती पंढरी तवाच्यानं।।
विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठावीसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असे घेता येईल.
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियेला वेधु । असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.श्री ज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा नामनिर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात. ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत.पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक, एकतेचे आणि प्रेमाचे ते प्रतीक आहे.
पंढरी नगरीच्या वस्तीच्या आधीपासून विठ्ठलाचे अस्तित्त्व तिथे आहे. किंबहुना विठ्ठलामुळे पंढरपूर हे गाव वसले आहे, असा या लोकमनाचा विश्वास आहे. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर संस्कृत आणि कन्नड लेख कोरलेला आहे. त्यात पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी आणि पंढरपूर ही नावं तयार झाली. गेल्या अनेक वर्षात पंढरपूरच्या वारीचं रूप बदललेलं पहायला मिळतं पण विठ्ठलावर नितांत श्रद्धा, मुखामध्ये नाम आणि शुद्ध आचार ही त्रिसूत्री वारीचा पाया झाली आणि विठ्ठल प्रेमाची बुलंद इमारत उभी राहिलेली आहे.