बीड मधील जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाईनगरी मार्गशीर्ष महिन्यात अगदी गजबजलेली असते. ज्याचं कारण आहे देवी योगेश्वरी . बीड मधील ही देवी कोकणातील अनेक कुटुंबीयांची कुलदैवत आहे. म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यात कोकण व मराठवाडा यांचा संबंध जोडणारी ही देवी योगेश्वरी कोण आहे? आणि बीड मधील ही देवी कोकणातील कुटुंबीयांची कुलदेवता कशी काय झाली? तेच जाणून घेऊयात
बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर बसलेले एक गाव म्हणजे आंबाजोगाई. याच भूमीत देवी योगेश्वरी निवास करते. योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप असून ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. योगीनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. या प्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे असे सांगितले जाते. विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिच्या दर्शनास येत असतात.
देवी योगेश्वरी च्या अवतारामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड हैदोस माजवला होता. याच असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि दांतसूराचा वध केला. दांतसूरचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस आंबेजोगाई, असे नाव प्रचलित झाल्याचं सांगण्यात येत. तर दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी म्हणून देखील ओळखली जाते.
शेंदूर लेपण केलेली तांदळा स्वरूपातील हि योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचं सांगितलं जात. एका दंत कथेनुसार परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. या विवाहासाठी कोकणातून देवी आणि बाकीची वन्हाडी मंडळी परळीला निघाले. पण ठरलेल्या लग्नाच्या मुहूर्तावर ते पोहचू शकले नाहीत आणि अखेर मुहूर्त टळून गेला. लग्नाचा शुभमुहूर्त टळून गेल्याने योगेश्वरी देवीचा विवाह झाला नाही. यामुळे योगेश्वरी देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे आंबाजोगाई.
तर बीडच्या भूमीत वास करणारी ही देवी कोकणातील अनेक चित्पावन ब्राह्मणांची व कोकणस्थ कुटुंबाची कुलदेवता आहे. कोकण भूमीची निर्मिती केल्यावर भगवान परशुरामांनी त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तेथील समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. तर या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईमधील कन्या वधू म्हणून नेल्या. तर या वधू लग्नासाठी नेताना देवी योगेश्वरीने भगवान परशुराम यांना एक अट घातली.”या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल.” अशी ती अट होती. तर त्या अटीप्रमाणे ज्यांच्याशी या मुलींचा विवाह झाला ते कोकणातील असल्याने, कोकणातील बहुतांश कुटुंबाची देवी योगेश्वरी ही कुलदैवता आहे.
तर तुम्ही कधी योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आहे का? तुम्हाला योगेश्वरी देवीची हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की सांगा…