पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा गौप्यस्फोट; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले,..

भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेबसाईटला मुलाखत देत अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केलेला आहे त्यात पहाटेच्या शपथविधीबद्दलही खुलासा आहे. दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे असे कोश्यारी म्हणाले.
शरद पवारांना या शपथविधीची माहिती होती का? असं विचारलं असता भगतसिंह कोश्यारी म्हणाले शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर तरची भाषा राज्याच्या राजकीय परिस्थितीविषयी करत असेल तर हायकोर्टात त्यांचं जे लवासाचं प्रकरण आहे त्यावर त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल. शरद पवारांचा मी खूप आदर करतो. माझ्या हस्ते त्यांना दोनवेळा डी. लिट ही पदवी माझ्या हस्ते प्रदान केली आहे. तरीही ते असं म्हणत असतील तर ते राजकीय बोलत आहेत असे कोश्यारी म्हणाले.
तुमच्यावर त्यावेळी कुणाचा दबाव होता का? असे विचारले असता कोश्यारी म्हणाले, नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला त्यानंतर मी त्यांना वेळ दिली. मग काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. त्यानंतर मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला. या सगळ्यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? असंही कोश्यारी यांनी म्हटलंय.