भेटीचं कारण काय? मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वेळ नाही !!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन गोष्टींकडे जनतेचे लक्ष लागले आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल. मंत्रिमंडळ विस्तारात दिल्लीमधून हस्तक्षेप करण्यात येतोय असा आरोप विरोधकांनी केला असताना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याची विशेष चर्चा होते आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी रद्द झाली. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटीसाठी वेळ मिळू शकली नाही असे कारण देण्यात आले होते मग आपल्या व्यस्त कार्यक्रमातून केंद्रीय गृहमंत्र्यांनी खास वेळ कसा आणि का काढला याच्या चर्चा रंगलेल्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत जाणार होते पण अचानक त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी वेळ मिळत नाही असे सांगण्यात आले होते पण अचानक गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान गिरीश महाजन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर भेटीचे फोटे शेअर केले आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमित शहा जी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली.. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली असं ट्विट करण्यात आलं आहे.
दरम्यान अशी माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री शिंदे बुधवारीच दिल्लीत दाखल झाले होते आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून गुरुवारी पहाटे मुंबईला परत आले. त्यामुळे येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगण्यात येत आहे.