नितीन गडकरी यांचा शेतकऱ्यांना सल्ला, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरी ओखळले जातात. त्यांनी आजही एक वक्तव्य केलं असून त्याची जोरदार चर्चा होतेय. माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजीपाला आणि फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी कसे प्रयत्न केले, याचे उदाहरण उपस्थितांना सांगताना गडकरी यांनी सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असे गडकरी यावेळी म्हणालेत.