कोणी ठेवली प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सोन्याने भरलेली बॅग?

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सोने, चांदी आणि पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. ही बॅग तेथे कशी आली, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.
प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना सुरक्षारक्षकाचा फोन आला.त्यांच्या घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी तात्काळ माटुंगा पोलिसांना फोन केला. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली. मात्र, अज्ञात व्यक्तीने लाड यांच्या घराबाहेर सोने-चांदीने भरलेली बॅग का ठेवली, हा प्रश्न कायम आहे.
माझ्या घराबाहेर बंदोबस्त असतानाही अज्ञात व्यक्ती अशाप्रकारे बॅग ठेवून जाते. त्यामुळे मी देखील धास्तावलो आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रसंग घडल्याने माझे कुटुंबीयही घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. दरम्यान, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करतील. ही बॅग नक्की कोणी लाड यांच्या घराबाहेर सोडली, हे पाहिले जाईल. त्यामुळे आता या तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.
गेल्याच आठवड्यात प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आपल्याला फोनवर अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले होते. आम्ही मुंबई पोलिसांच्या संबंधित विभागाला सीडीआर रिपोर्ट काढून मला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले आहे. आमची पोलिसांना विनंती आहे की आम्हाला धमकी देणाऱ्या आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशी घटना इतर कोणावरही घडू नये, असेही त्यांनी सांगितले होते.