नारायण राणेंचे सनसनाटी आरोप !

संजय राऊत यांनी घेतलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज (२६ जुलै) प्रसारीत करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर घणाघाती आरोप करत त्यांच्यावर सडकून टीका केली. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला मारण्याची सुपारी दिली आणि ज्यांना दिली त्यांनीच मला हे सांगितलं असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला, त्यांचा छळ केला असा आरोप नारायण राणे यांनी केला. तसेच वारसा फक्त रक्ताचा असतो विचारांचा नसतो का असा प्रश्न देखील राणेंनी उपस्थित केला. नारायण राणे म्हणाले, वारसा रक्ताने नाही तर विचाराने मिळवायचा असतो.मी शिवसेनेत असताना आई-वडिलांचे कधीच ऐकले नाही पण बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द ऐकला. आज साहेब साहेब करतो आहे कारण त्याला माहित आहे बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर मोठं शुन्य म्हणजे उद्धव ठाकरे.
माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केला होता त्यावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली.काय बोलतो वडिलांबद्दल ते आमचं दैवत आहे. त्यावेळी साहेब असताना त्यांचं काही ऐकलं नाही पण आम्ही साहेब सांगितील ते ऐकत गेलो पण हे तू केलंस का आमच्या दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकेरंना विचारण्याची गरज नाही असा घणाघात राणेंनी केला.
सत्तेतून बाहेर पडल्यानंतर हिंदुत्व, मराठी माणूस आठवतो आहे. सत्ता गेली म्हणून जळफळाट होतो आहे आणि केविलवाणी अवस्था झाली आहे.उद्धव ठाकरे यांना मी ४० वर्षे ओळखतो, त्यांच्या अंगात खोटेपणा, कपटीपणा आणि द्वेष भरलेला आहे अशी टीका सुद्धा नारायण राणे यांनी केली.