राष्ट्रीय पातळीवर गडकरींचं वजन घटत चाललंय का ?

महाराष्ट्रामधील भाजपवर सध्या कोणत्या व्यक्तीचं एकहाथी वर्चस्व आहे असा प्रश्न विचारला असता आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस ! आता तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा महाराष्ट्रातील भाजपच्या पसंतीचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आलंय.केंद्रीय निवडणूक समितीचे महत्त्वाचे काम म्हणजे निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची त्यामधील तिकीट वाटप अंतिम करण्याचे महत्त्वाचे काम या समितीकडून करण्यात येते. खरंतर योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस वगळता कोणत्याही अन्य मुख्यमंत्र्याला यात स्थान मिळालेल नाही.
केंद्रीय निवडणूक समितीमध्ये फडणवीस यांना स्थान देण्यात आलंय पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र बाजूला करण्यात आलेलं आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर गडकरींचे वजन कमी होते आहे अशी चर्चा आता सगळीकडे सुरु झाली आहे. भाजपात पदभार देताना वयाचा नियम लावला जातो. आता नितीन गडकरी यांचे वय ६५ आहे. तर केंद्रीय संसद समीतीमध्ये घेतलेले येडीयुरप्पा यांचे वय ७७ वर्षे आहे.खरंतर भाजपात पंचाहत्तरीचा नियम लावला जातो मग येडीयुरप्पा यांच्यासाठी तो शिथील का केला गेला? नितीन गडकरी यांना इतक्या लवकर एक्झिट का? असे प्रश्न उपस्थित केले जात असून त्यांची चर्चा सुरु आहे.भाजपच्या पक्षीय संघटनेतला सर्वात मोठा बदल आज जाहीर करण्यात आलेला आहे. या संघटनात्मक बदलांमधून मोदी आणि शाह यांच्या भाजपने एक नवा संदेश दिला आहे असेही म्हटले जाते आहे.