भाजप शिवसेनेची ‘ही’ मोहिम हायजॅक करणार!!

भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीए. शिवसेनेने ‘गाव तेथे शाखा’ ही मोहीम राबवली होती. आता भाजप सुद्धा गाव तिथे शाखा मोहीम राबवणार असल्याचे समोर आलंय. म्हणजेच आता भाजपने शिवसेनेच्या ही मोहिमसुद्धा हायजॅक करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजप सरकारने आता आपला मोर्चा शिवसेनेच्या शाखांकडे वळवला आहे.
गाव तिथे शाखा या शिवसेनेच्या मोहिमेच्या माध्यमातून एकेकाळी शिवसेनेने तुफान यशाचे शिखर गाठले होते. पण आता भाजपनेही शिवसेनेच्या या यशाचा कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतलाय. येत्या काळात भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा सुरू करण्याचा निर्धार केलाय.युवकांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
गावा-गावातील युवकांना आकर्षित करुन गाव आणि शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचवण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राष्ट्रउभारणीसाठी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. यासाठीही भाजपने नियोजनाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.