मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दर्शन डिप्लोमसी?

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीवर राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदेगट आणि भाजपाला दिलंय. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची देखील दर्शन डिप्लोमसी सुरू केलीय.
आता तुम्ही म्हणाल ही दर्शन डिप्लोमसी म्हणजे नक्की काय आहे? गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर्शन करत अनेकांच्या भेटीगाठी घेतायेत.शिंदे गणेशोत्सव काळात मुंबईत काही मंडळांच्यां तसेच शिवसेना नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत दिवसेंदिवस संवाद वाढवत आहेत. यात विशेष करून ठाकरे गटातील नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी शिंदेंनी वाढविलेल्या आहेत. अगदी मध्यरात्री किंवा भल्या पहाटे शिंदे गणपती दर्शन करत आहेत.मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे मुंबई दर्शन करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन किर्तीकर यांच्या भेटी घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. आता BMC निवडणुकिची तयारी प्रत्येक पक्ष करतोय त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तम संवाद , समन्वय आणि संपर्क साधत सर्वसामान्य ते प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतायेत आता त्याचा किती फायदा होतो हे येणारा काळच सांगेल.