शाहरुखला बॉयकॉट ट्रेन्डची भीती, घेतला ‘हा’ निर्णय !

‘लाल सिंग चड्ढा’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘दोबारा’, ‘लायगर’ सारखे बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अगदी सुपरफ्लॉप ठरले. इतकंच नव्हे तर नव्याने येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटांना बॉयकॉट या ट्रेंडचा सामना करावा लागतोय. यामध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचाही समावेश आहे. पण बॉयकॉट या ट्रेंडमुळे शाहरुखने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘बॉयकॉट पठाण’ (#BoycottPathan) ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’प्रमाणे ‘पठाण’ला देखील प्रेक्षकांचा विरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. बऱ्याच काळानंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. पण बॉयकॉट ट्रेंडमुळे शाहरुखने एक महागडा चित्रपट करण्यास नकार दिलाय.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनूसार, ‘डॉन ३’ चित्रपटासाठी शाहरुखला विचारणा करण्यात आली होती. मात्र बॉयकॉट ट्रेंड आणि बॉलिवूडची सध्याची परिस्थिती पाहता त्याने हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिलाय. ‘डॉन ३’ चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शाहरुख फार उत्साही असल्याचं याआधी समोर आलं होतं. फरहान अख्तरने या चित्रपटाच्या कथेसाठी बरीच मेहनत देखील घेतली होती. पण ‘डॉन’ ही सुपरहिट भूमिका पुन्हा रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी अधिक मेहनत आणि योग्य त्या वेळेची गरज आहे असं शाहरुखचं म्हणणं आहे. शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे.