मुंबईमुळे लिझ ट्रस बनल्या ब्रिटनच्या पंतप्रधान?

लिझ ट्रूस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या असून त्यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव केलाय.त्यांच्या निवडीमुळं भारत ब्रिटन यांच्यातले संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. लिझ ट्रूस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटची सगळीकडे चर्चा होतेय.
लिझ ट्रूस यांनी मुंबईला भेट दिली होती त्यावेळेची आठवण आदित्य ठाकरेंनी ट्वीट करून सांगितली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय,” त्या प्रथम मुंबईला आल्या तेव्हा वाणिज्य मंत्री होत्या. परतल्या आणि आणि परराष्ट्र मंत्री झाल्या. म्हणून नंतर त्या दुसऱ्यांदा आल्या तेव्हा मी गंमतीने म्हटले होते की मुंबई भेट भाग्याची ठरतेय आपल्यासाठी. आता पुढची बढती मिळाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि झाल्याच की आता त्या पंतप्रधान.”
लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेली चढाओढ अखेर संपली असून ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला.