पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांतदादांनी गुपित फोडलं, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं !

पुणे तिथे काय उणे असे म्हणतात. आता पुण्यात सध्या एकाच गोष्टीची चर्चा होते आहे ती म्हणजे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार. फेमस पुणेरी पाट्यांवरून काही माहिती समजलेली नसली तरी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीची मजबूत पकड असलेल्या पुण्याच्या पालकमंत्रिपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान चंद्राकांत पाटील यांनी याबाबतंच गुपित फोडलंय.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील पुण्याकडे रवाना झाले होते. शिरुरला जाऊन त्यांनी माजी आमदार, ज्येष्ठ भाजप नेते बाबुराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांनी जेवण घेतलं. तिथून बाहेर पडत असताना शिक्रापूरच्या ग्रामस्थांनी त्यांना गराडा घातला.ग्रामस्थांना फडणवीसांच्या कानावर अनेक समस्या घालायच्या होत्या तेव्हढ्यात चंद्रकांत पाटील म्हणाले, पुढे व्हा आणि बोला तुमच्या पालकमंत्र्याशी. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा रोख तेथिल ग्रामस्थांना समजला. तिथे बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचे आता काऊंटडाऊन सुरू झालं आहे. फडणवीसांच्या या इशाऱ्याची शिक्रापूरात जोरदार चर्चा सुरु आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुका तसेच पुण्यातील ग्रामीण भागात असणारे राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसात ही गोष्ट स्पष्ट होईल.