काल मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
39 मंत्र्यांनी शपथ घेतली म्हणून कमी, आणि काही दिगज्जांनी या सोहळ्यात शपथ घेतली नाही, म्हणून सोहळा जास्त गाजला. तर कोणत्या माजी मंत्रयांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, तेच जाणून घेऊयात
सर्वात पहिल नाव आहे, छगन भुजबळ यांच! राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक, माजी गृहमंत्री ते ओबीसी नेते अशी मोठी ओळख असलेले आणि राजकारणात दांडगा अनुभव असणारे आमदार छगन भुजबळ यंदा मात्र मंत्रीपदापासून लांब राहिले आहेत. येवला मतदार संघातून पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर छगन भुजबळ यांना यंदाही मंत्री पद न मिळाल्याने येवल्यामध्ये अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवत टायर जाळण्यात आले आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात येईल, छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झालाय, अशा बातम्या शपथविधी सोहळ्याच्या अगोदर पासून येत होत्या. मात्र तरी देखील छगन भुजबळ शपथ घेतील अशी शक्यता होती. मात्र या सर्व शक्यता फोल ठरल्या आणि छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली नाही. तर मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी दिली जाणार आहे अश्या चर्चा चालू आहेत.
मंत्रिमंडळातून पट्टा कट झालेले दुसरे माजी मंत्री व विद्यमान आमदार आहेत दीपक केसरकर. शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर हे मागील महायुती सरकार मध्ये मंत्री राहिले होते. त्या आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील ते मंत्री राहिले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले दीपक केसरकर हे राजकारणातील एक अनुभवी नेते मानले जातात. मागील 2019 च्या निवडणुकीवेळी ही माझी शेवटची टर्म आहे असे दीपक केसरकर म्हणाले होते. पण असं म्हणून देखील दीपक केसरकरांनी 2024 विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. मात्र यंदा त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं गेलाय.
मंत्री पदापासून दूर राहिलेले तिसरे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत. मागील महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे मंत्रीपदाचे मानकरी ठरले होते, मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना स्थान मिळालं नाहीये. दरम्यानच्या काळात “मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बाजूला बसावे लागते. पण बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात” असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होत, आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या याच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहेत.
मंत्रिमंडळातून लांब राहिलेले पुढचे मंत्री आहेत अब्दुल सत्तार. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर मागील काही काळात अब्दुल सत्तार यांनी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यांवरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती आणि याच सगळ्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदापासून दूर रहावं लागलं अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व आठ वेळा आमदार राहिलेले मागील महायुती सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळाल नाहीये. दिलीप वळसे पाटील यांचे वय जास्त असून त्यांच्या प्रकृतिचा विचार करून दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी देखील दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं आहे असं म्हंटलं जातंय.
भाजपचे विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. लोकसभेतील पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार हे काहीसे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याचं पाहायला मिळालं होत, त्यानंतर त्यांना विधानसभेला भाजप कडून तिकीट मिळेल का नाही यावर देखील साशंकता व्यक्त केली जात होती, मात्र तेव्हा त्यांना तिकीट मिळालं ते जिंकूनही आले मात्र त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं गेलाय.
यासोबतच भाजपचे रवींद्र चव्हाण यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाहीये. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलंय. त्यामुळे आता मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या रवींद्र चव्हाण यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पद देऊ शकते.असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या दिगज्जांसोबतच मागील मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या विजयकुमार गावित, संजय बनसोडे, अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे.दरम्यान या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेर जरी ठेवण्यात आलं असलं, तरी सुद्धा अजित पवारांनी जाहीर केल्याप्रमाणे काल शपथ घेणारे मंत्री हे केवळ अडीच वर्षांसाठीच असणार आहेत. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या काळात या आमदारांना संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुमचे मत काय? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…..