ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी, काय आहे रहस्य ?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आता महिना उलटून गेला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे पण ठाकेर आणि शिंदे या दोघांमध्ये शिवसेनेवरील वर्चस्वावरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तर युवानेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्राकरून पुन्हा एकदा शिवसेनेला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटी घेवून शिंदेंना नक्की काय साध्य कराचे आहे.
शिंदे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची त्यांच्या वाढदिवशी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी कदम यांनी शिवसेनेवर जोरदार आरोप करत शिंदेगटात आपला सहभाग नोंदवला. ढसाढसा रडणारे रामदाक कदम आपण न्यूज चॅनलवर पाहिलेच असतील. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची भेट घेतली. गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचे ऑपरेशन झाले असून त्यानिमित्ताने त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेण्यात आली असे सांगितले गेले. किर्तीकर हे जुने शिवसैनिक असून त्यांचं शिवसेनेतील वजन सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याच बरोबर त्यांचा राष्ट्रावादीसोबतचा रोष सुद्धा जगजाहीर आहे. गजानन किर्तीकर सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहेत पण भविष्यकाळात त्यांची साथ आपल्याला मिळावी म्हणून ही भेट झाली असावी असेही बोलले जाते आहे.
शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांचीसुद्धा भेट घेतली. डाके तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते असून त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाली असे बोलले जात आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीदेखील भेट घेतली. मनोहर जोशी आणि बाळासाहेब यांचे नाते याबद्दल विशेष सांगायला नको. मनोहर जोशी यांचा उद्धव आणि राज या दोघांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मध्यंतरी बाळासाहेबांच्या स्माराकावरून जोशींनी केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंचा रोष त्यांनी ओढावून घेतला होता पण तो तेवढाच होता पुन्हा दोघांचे संबंध चांगले झाले. या सगळ्या भेटीगाठीचा असाच अर्थ लावला जातो आहे की शिंदे शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे काय होईल जास्तीत जास्त शिवसैनिक शिंदेगटाकडे येतील आणि शिंदे गट अधिक मजबूत होईल शिवाय शिवसेनेवर वर्चस्व मिळविणे सोपे जाईल असे बोलले जाते आहे. तसेच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत याचा फायदा एकनाथ शिंदेंना होवू शकतो.आता ठाकरे-शिंदे वादात या भेटीगाठी किती फायदेशीर ठरतात ते येत्या काळात समजेलच.