संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन चित्रा वाघ संतप्त !

शिंदे गटातील आमदास संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ त्यांनी आज घेतली मात्र त्याच दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे असे म्हटले आहे. महाविकास आघाडीमध्ये राठोड मंत्री असताना त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून चित्रा वाघ यांनी रान उठवलं होत आणि त्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आज जेव्हा राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा चित्रा वाघ यांनी पुन्हा आपला रोष व्यक्त केला आहे. संजय राठोड पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे असे त्यांनी म्हटले आहे.
बीडमधील परळी येथील टीकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीन आत्महत्या केली होती, तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाणचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले होते त्यातील आवाज संजय राठोड यांचा आहे असेही आरोप होते. त्यानंतर काही काळ संजय राठोड नॉटरिचेबल होते. काही काळानंतर ते बंजारा समाजाच्या कार्यक्रमात दिसू लागले, त्यानंतर पूजा चव्हाणचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा वानवडी पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाला होता.