गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून 4158 घरांसाठी लॉटरी जाहीर, कुठल्या परिसरात किती घरे?

तुम्ही मुंबई, नवी मुंबईमध्ये नवीन आणि परवडणारे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.गणेशोत्सवात आनंद द्विगुणीत करण्यासाठी सिडकोकडून 4 हजार 158 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलीय. यासोबतच 245 वाणिज्यिक गाळे, 6 कार्यालये आणि विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना सुद्धा आहे.
सिडको महामंडळातर्फे, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4158 घरांसोबतच 245 गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील 6 कार्यालये आणि त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आले आहेत.
महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आहेत. तर उर्वरित 3754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
या लॉटरीच्या संदर्भात सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.