सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा डंका ! सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मंगळवारी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केलली आहे. म्हणजे लळीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीतच ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवलेले आहे. लळीत ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत.
केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. त्यानुसारच लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची शिफारस केलेली आहे. धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती असून ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. सरन्यायाधीश लळीत यांनी केलेल्या शिफारशीमुळे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठीचा डंका पहायला मिळणार आहे.