CM शिंदे, फडणवीस आणि भागवत यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आज (१ ऑगस्ट) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीमध्ये जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांनी अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांबरोबरही भेटीगाठी केल्या. आज सरसंघचालक यांच्याबरोबर झालेल्या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबद्दल सगळ्यांना उत्सूकता होती. 

या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले ‘ही एक सदिच्छा भेट होती. नवीन सरकारसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आणि आशिर्वाद घेतले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हिंदुत्वाच्या नात्याने जोडल्या गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजळा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला. यासमयी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी डॉ.मोहन भागवत यांनी अनेक आशीर्वाद देऊन मौलिक मार्गदर्शन केले’ असेही शिंदे म्हणाले. या भेटीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मोहन भागवत यांचे शाल देऊन स्वागत केले.

तब्बल पाऊण तास ही भेट चालली होती यामध्ये हिंदुत्व या विषयावर चर्चा झाली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही फक्त सदिच्छा भेट होती असे बोलले जात असले तरी भाजप सरकारमध्ये आरएसएसचा रोल किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांना माहितच आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवानाकडे रवाना झाले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासंर्भात लवकरच काही घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.