उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का? काय म्हणाले, शिंदे?

सर्व लोकांना न्याय देण्याच काम आम्ही करु, लोकांच्या मनातलं हे सरकार आहे. केंद्र सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकित केलं आहे. शरद पवारांच्या या विधानावर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता, शरद पवार बोलतात, त्याच्या उलट होतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आमचं सरकार पुढील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
आज आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच पत्रकार परिषदेत तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का?, असा सवाल विचारला असता, एकनाथ शिंदे यांनी सदर प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.