मातोश्रीची पॉवर वाढली, ठाकरेंना ऐतिहासिक पाठिंबा !

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक म्हणजे ठाकरेंसाठी अग्निपरीक्षाच आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाकडून होणारे वार सहन करत ठाकरे पुढे जात आहेत. ठाकरेंसाठी संकटाचा काळ आहे पण सध्या मातोश्रीची पावर वाढलेली आहे. कारण पन्नास वर्षापूर्वी पोटनिवडणुकीतच शिवसेना नावाचा ब्रँड तयार झाला होता. पण आता हेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी अंधेरी पोटनिवडणुकीत एकत्र आलेत. शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीच्या कात्रीत सापडलेल्या ठाकरेंसाठी हा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यात गेल्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेशी हाडवैर असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने ठाकरेंना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. भाकपचे नेते, पदाधिकारी यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. तसं पाहिलं तर मुंबईत आता डाव्या पक्षांचा फारसा धबधबा नाही पण सध्या ठाकरेंसाठी हा पाठिंबा मनोबल वाढवणारा असल्याचं म्हटले जातंय कारण त्याला खास इतिहास आहे.
तो काळ होता १९७० चा जेव्हा लालबाग परळच्या आमदाराची हत्या झाली. कॉ. कृष्णा देसाई असे त्या आमदाराचे नाव आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिली राजकीय हत्या होती असे म्हणतात. त्यानंतर लालबाग-परळमध्ये पोटनिवडणूक लागली. त्याकाळात कम्युनिस्टांचा तेव्हा मुंबईच्या समाजकारण राजकारणावर मोठा दबदबा होता. ही हत्या शिवसैनिकांनी केली असा आरोप होता. पण मिल कामगारांच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं इतिहासातला पहिला विजय मिळवला आणि विधानसभेत एन्ट्री घेतली. शिवसेनेचे वामनराव महाडिक आमदार झाले. मग काय तिथून कम्युनिस्ट आणि शिवसैनिक एकमेकांचे हाडवैरी झाले. मुंबईच्या राजकारणात शिवसेनेचा धडा सुरु झाला.
आता पन्नास वर्षांनी हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले आणि तेसुद्धा पोटनिवडणुकीच्या निमित्तानेच ! ही एक ऐतिहासिक घटना असून पन्नास वर्षानंतर भगव्याला लाल बावट्याची साथ मिळाली आता राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद कसे उमटणार ते समजेलच.